CoronaVirus : आमदाराच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण, जिल्ह्यात एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 11:14 AM2020-05-05T11:14:35+5:302020-05-05T11:16:53+5:30
CoronaVirus : आतापर्यंत मध्य प्रदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजारहून अधिक आहे. तर १६५ लोकांचा मृत्यू झाला आहे.
बुरहानपूर : मध्य प्रदेशात भोपाळ, इंदूर आणि उज्जैननंतर आता इतर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत मध्य प्रदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजारहून अधिक आहे. तर १६५ लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, बुराहनपूरमधील अपक्ष आमदाराच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी आमदाराच्या भावाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर रविवारी कुटुंबातील इतर व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
रविवारी बुरहानपूरमध्ये १६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. या नव्या रुग्णांपैकी तीन रुग्ण आमदाराच्या कुटुंबीयांपैकी आहेत. येथील स्थानिक वृत्तपत्रानुसार, आमदाराच्या भावाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या पुतण्याला, सुनेला आणि तीन वर्षांच्या नातवाला सुद्धा कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
बुरहानपूरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 34 इतकी आहे. त्यापैकी 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पाच उपचारनंतर बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये माजी नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबातील 10 लोक आहेत. तसेच, 2 डॉक्टरांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान, आमदाराच्या कुटुंबातील लोकांना कोरोनाचा संसर्ग कसा झाला, हा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. तसेच, त्यांच्या प्रवासाच्या इतिहासाविषयी आरोग्य विभागाच्या अधिका्यांकडूनही माहिती घेतली जात आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी मध्यप्रदेशात राजकीय घडामोडी घडल्या. त्यावेळी हेच अपक्ष आमदार बंगळुरुमध्ये राहत होते. मात्र, गेल्या काही दिवसांनी ते मध्य प्रदेशात परतले होते.