अहमदाबाद : अहमदाबादमधील एका ५५ वर्षीय व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. गेल्याकाही दिवसांपूर्वी या व्यावसायिकाने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांची मदत केली होती. सोमवारी या व्यावसायिकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.
अहमदाबादमधील मणिनगर येथे राहणाऱ्या या व्यावसायिकाने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना जेवणाची पॅकेट आणि पाण्याची सोय केली होती. मात्र, हे साहित्य लोकांना देण्यासाठी त्यांनी स्वत: सहभाग घेतला नव्हता. अहमदाबाद महानगरपालिकेच्या दक्षिण वार्डचे उप-आरोग्य अधिकारी तेजस शाह यांनी सांगितले की, " या व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाली आहे. ते लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना मोफत जेवण देत होते."
लॉकडाऊनदरम्यान लोकांना जेवण तयार करण्याची जबाबदारी या व्यावसायिकाने एका स्वयंपाकीला दिली होती. तसेच, हे जेवण लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुद्धा काही लोकांकडे सोपविले होते. तरी सुद्धा हे व्यावसायिक कोणाच्या संपर्कात आले, याचा अंदाज येत नाही आहे. दरम्यान, व्यासायिकाच्या संपूर्ण कुटुंबीयांसह १३ लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच, येथील स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, "व्यावसायिक कोणाच्या संपर्कात आला, याचा शोध अद्याप लागला नाही. तसेच, ते बरेच दिवस घरातच होते. याशिवाय त्यांची कोणती ट्रॅव्हल्स हिस्ट्री सुद्धा नाही आहे. मात्र, आता त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असल्यामुळे आरोग्य संस्था त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत आहेत."
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ७०४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत ४२८१ लोकांनी कोरोनाची लागण झाली आहे.