नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाल्यानं लाखो मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मजुरांनी मिळेल त्या मार्गानं गावची वाट धरली. अनेक मजूर शेकडो किलोमीटरचा रस्ता तुडवत घराकडे निघाले. कडाक्याच्या उन्ह्यात चालणाऱ्या मजुरांची अवस्था पाहून अनेकांचं मन हेलावलं. एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसरीकडे एका मोठ्या व्यवसायिकानं त्याच्या कुटुंबातल्या चार सदस्यांना भोपाळहून दिल्लीला आणण्यासाठी १८० आसनी विमानं (एअरबस ए ३२०) भाड्यानं घेतलं. यामध्ये व्यवसायिकाची मुलगी, तिच्या दोन मुली आणि त्यांना सांभाळणाऱ्या महिलेचा समावेश होता. मद्य व्यवसायिक जगदीश अरोरा मध्य प्रदेशातल्या सोम डिस्टलरीजचे मालक आहेत. याबद्दल विचारणा केली असता, सुरुवातीला त्यांनी एअरबस भाड्यानं घेतल्याचं वृत्त फेटाळलं. मात्र त्यानंतर तुम्ही माझ्या खासगी आयुष्याबद्दल का विचारणा करत आहेत, असा प्रश्न केला. अरोरा यांनी भाड्यानं घेतलेल्या विमानानं सकाळी साडे नऊ वाजता दिल्लीवरून झेप घेतली. साडे दहा वाजता ते भोपाळला पोहोचलं. त्यानंतर चार प्रवाशांसह साडे अकरा वाजता विमानानं दिल्लीसाठी उड्डाण केलं.अशा प्रवासासाठी सहा आणि आठ आसनी चार्टर्ड विमानांचा पर्याय असतो. मात्र व्यवसायिकानं एअरबसचा पर्याय निवडला, अशी माहिती उड्डाण विभागातल्या सुत्रांनी दिली. श्रीमंत व्यक्ती कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी इतरांसोबत प्रवास करू इच्छित नाहीत. मात्र चार्टर्ड विमानानंदेखील हा उद्देश सफल सफल होऊ शकला असता, असं सुत्रांनी सांगितलं. एअरबस ए ३२०चं दर तासाचं भाडं ५ ते ६ लाख रुपये आहे.
CoronaVirus News: ...अन् 'त्या' चौघांना आणण्यासाठी मद्य व्यवसायिकानं भाड्यानं घेतलं १८० आसनी विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 8:08 PM