Coronavirus: चिडलेल्या वकीलाचा हायकोर्टातील न्यायाधीशांना श्राप; जा, तुला कोरोना होईल, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 02:46 PM2020-04-08T14:46:18+5:302020-04-08T14:47:58+5:30
सुट्टीच्या दिवसानंतर ज्यावेळी न्यायालय पुन्हा सुरु होतील तेव्हा या प्रकरणाची खंडपीठामार्फत सुनावणी होईल.
कोलकाता – देशात कोरोना रुग्णांची संख्या ५ हजारांच्या वर पोहचली असताना १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये असं वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाची दहशत लोकांच्या मनात इतकी निर्माण झाली आहे की याबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत.
कोलकातामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मनाविरुद्ध निकाल दिल्याने एका वकीलाने कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना जा, तुम्हाला कोरोना होईल अशाप्रकारे विधान केलं. वकीलाच्या या वागणुकीमुळे न्यायाधीशांनी अवमानाची कारवाई केली. न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या कोर्टाने न्यायालयाच्या प्रतिमेला धक्का पोहचवणाऱ्या वकील विजय अधिकारी यांची निंदा केली आणि त्यांना नोटीस पाठवल्यापासून १५ दिवसांच्या आत म्हणणं मांडण्याचे आदेश दिलेत.
न्यायाधीश दत्ता यांनी आदेशात सांगितले की, सुट्टीच्या दिवसानंतर ज्यावेळी न्यायालय पुन्हा सुरु होतील तेव्हा या प्रकरणाची खंडपीठामार्फत सुनावणी होईल. कोरोना व्हायरसमुळे कोलकाता उच्च न्यायालयात १५ मार्चपासून फक्त अत्यावश्यक प्रकरणांची सुनावणी सुरु आहे. २५ मार्चपासून याठिकाणी व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे सुनावणी घेण्यात येत आहे.
वकील विजय अधिकारी यांनी कर्ज न चुकवल्यामुळे बँकेकडून त्यांच्या याचिकाकर्त्यांची बस लिलाव होण्याला स्थगिती द्यावी अशी याचिका सुनावणीसाठी होती. या बसची १५ जानेवारीला जप्त केल्याची माहिती मिळतास कोर्टाने या प्रकरणावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. ज्यावेळी न्यायाधीशांनी आदेश देण्यास सुरुवात केली त्यावेळी वकील विजय अधिकारी वारंवार त्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते.
न्यायाधीश दत्ता यांनी सांगितले की, अधिकारी यांना वारंवार नीट वागण्याची समज देऊन सुद्धा त्यांनी यावर लक्ष दिलं नाही. त्यांनी माझं भविष्य अंधारमय बनवून टाकू आणि त्यासाठी मला कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ दे असा श्राप दिला. न्यायाधीशांनी वकील अधिकारींना बजावलं की, मला भविष्य अंधारमय होण्याची ना कोरोना संक्रमण होण्याची भीती आहे. मात्र न्यायालयाची प्रतिमा मलिन होण्यापासून रोखणं आणि त्याचं पावित्र्य कायम राखणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अवमान कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.