Coronavirus: विधानभवनाच्या बैठकीत काँग्रेस आमदाराला कॉल, तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:05 PM2020-06-23T12:05:59+5:302020-06-23T12:07:41+5:30
कोरोनाच्या संकटकाळात छत्तीसगडमधील डोंगरगावचे काँग्रेस आमदार यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. राजनांदगाव जिल्ह्यातून येणाऱ्या या आमदारामध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली होती.
भिलाई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अवघ्या जगावर संकट उभं राहिलं आहे. आतापर्यंत ८० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा साडेतीन लाखांपेक्षा जास्त झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी वारंवार लोकांना सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्याचं आवाहन केले जात आहे.
कोरोनाच्या संकटकाळात छत्तीसगडमधील डोंगरगावचे काँग्रेस आमदार यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. राजनांदगाव जिल्ह्यातून येणाऱ्या या आमदारामध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली होती. त्यासाठी या आमदाराने कोरोनाची चाचणीही केली पण नियमांचे पालन करणं विसरुन गेले. मात्र त्यामुळे या काँग्रेस आमदाराच्या संपर्कात येणाऱ्या हजारो जणांवर कोरोना सक्रमणाचं सावट निर्माण झालं आहे.
सोमवारी प्रश्नोत्तर समितीची विधानभवनात बैठक होती, त्यावेळी हे आमदार त्याठिकाणी हजर झाले. बैठकीदरम्यान त्यांना एक फोन आला, या फोनवरुन त्यांना तुमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. त्यानंतर बैठकीत उपस्थित सदस्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली होती. डोंगरगावच्या काँग्रेस आमदाराच्या संपर्कात आलेले इतर ६ आमदार आणि अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आमदाराला उपचारासाठी रायपूरच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोना चाचणी केल्यानंतरही आमदार त्यांच्या मतदारसंघातील अनेक लोकांच्या संपर्कात आले होते. आरोग्य विभागाच्या टीमने आमदारांची माहिती घेत त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेणे सुरुवात केली आहे. छत्तीसगडमध्ये कोरोना व्हायरसच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी राज्यात ४६ नवीन रुग्ण आढळून आले असून, गेल्या २४ तासांत १६७ कोरोना रुग्णांची नोंद होऊन एकूण कोरोनाचे प्रमाण २०३२ वर पोहचले आहे.
राजनांदगाव जिल्ह्यात कोरोनामुळे दुसरा मृत्यू झाला आहे. यापूर्वी कोरोना मयत वृद्ध व्यक्तीच्या वडिलांचेही सोमवारी निधन झाले. दरम्यान, पुन्हा एकदा सामुहिक संसर्गाचे प्रकरण चर्चेत आले आहे. सोमवारी १५ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. डोंगरगावच्या आमदारासह लखोलीतील मृत कोरोना यांच्या संपर्कात आलेल्यांना आज संसर्ग झाला आहे. सर्वांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.