श्रीनगर -चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यानंतर हळूहळू कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, देशातील सर्वच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येते. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन असल्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह देशातील दिग्गज राजकीय नेत्यांनाही या परिस्थितीला कठीण प्रसंगातून सामोरे जावे लागत आहे.
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे काका आणि फारुक अब्दुल्ला यांचे बंधु मोहम्मद अली मट्टू यांचे रविवारी निधन झाले. मट्टू यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर, ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन आणि प्रसिद्धी माध्यमांतून त्यांच्या समर्थकांना घरीच राहण्याचे आवाहन केलंय. सध्या देशात कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आलं असून नागरिकांनी आपल्या घराकडे न येता, स्वत:च्या घरी राहूनच त्यांच्या काकांप्रती श्रद्धांजली अर्पित करावी, असे आवाहन ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या काकाच्या निधनाची माहिती दिली. माझे काका मोहम्मद अली मट्टू यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले, या कठिण प्रसंगातीही लोकांनी आपल्या घरीच थांबावे, सरकारी नियमांचे पालन करावे, आपण घरातून श्रद्धांजली अर्पण केल्यासही त्यांच्या आत्म्यास शांती लाभेल, असे भावनिक ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केले होते. अब्दुल्ला यांच्या या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिट्विट करत संवेदना व्यक्त केल्या.
ओमर अब्दुल्ला यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर त्यांच्या काकांच्या आत्म्यास शांती देवो, या कठिणप्रसंगातही आपण, नागरिकांना गर्दी न करण्याचा दिलेला संदेश स्वागतार्ह आहे. देशातील कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळकट करण्याचं काम या संदेशातून होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.
दरम्यान, सध्या ओमर अब्दुल्ला यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत घरात लॉकडाऊन असलेल्या नागरिकांना ट्विटरवरुन सूचना आणि जनजागृती करण्याचं काम हाती घेतलं आहे. आपण, बंदीवासात असताना कशाप्रकारे आपला वेळ घालवत होतो, हा अनुभवही ट्विटरच्या माध्यमातून ओमर अब्दुल्ला सांगत आहेत.