नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यानंतर रेल्वेनेही ३ मेपर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचं जाहीर केले. त्यामुळे १५ एप्रिल ते ३ मे दरम्यान देशभरात ज्या लोकांनी रेल्वेचे तिकिट बुक केले आहेत, त्यांचे बुकिंग आता रद्द केले जाणार आहे.
कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने यापूर्वी देशभरात २१ दिवस लॉकडाऊन केलं होतं. मात्र लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु झाला असून ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. पहिल्या लॉकडाऊन दरम्यान ट्रेनच्या तिकिटांचे बुकिंग सुरू होते. १४ एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा रेल्वेचा प्रवास सुरू करता येईल, अशी लोकांना आशा होती. लॉकडाऊन दरम्यान ३९ लाख रेल्वे तिकीट बुकींग करण्यात आले होते पण लॉकडाऊन वाढविल्यानंतर रेल्वेने मंगळवारी 3 मे पर्यंत सर्व प्रकारच्या प्रवासी सेवाच रद्द केल्या नाहीत तसेच या काळात केलेले बुकिंगही रद्द केले.
ज्यांनी रेल्वेचे तिकीट आरक्षित केले आहे त्यांना तिकिटांची संपूर्ण रक्कम परत मिळेल. तिकिटांची रक्कम प्रवाशांच्या खात्यावर परत येईल. त्याचबरोबर काउंटरद्वारे बुकिंग करणार्यांना तिकिटांची संपूर्ण रक्कम परत मिळणार आहे. संपूर्ण परतावा स्वयंचलितपणे त्यांच्या ऑनलाईन ग्राहकांना देण्यात येईल, तर ज्यांनी काऊंटरवरुन तिकीट काढले आहे अशांनी ३१ जुलैपर्यंत परतावा घेऊ शकतात असं रेल्वेने म्हटलं आहे.