नवी दिल्ली: देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, भारताची राजधानी असलेल्या दिल्लीतही परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्य सचिव, पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिस्थितीची माहिती घेतली आहे. नायब राज्यपालांनी आरोग्य व्यवस्था, आयसोलेशन होत असलेल्या लोकांचा आढावा घेतला. त्यानंतर अरविंद केजरीवालांनी मोठी घोषणा केली आहे.कोरोनाग्रस्तांचा उपचार करताना कोणत्याही डॉक्टर, नर्स किंवा अन्य आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १ कोटींची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा निर्णय खासगी आणि सरकारी दोन्ही रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. नायब राज्यपालांनी दिल्लीतले कोरोनाच्या प्रादुर्भावाची महत्त्वाची ठिकाणं असलेल्या भागात फायर ब्रिगेडच्या मदतीनं जंतुनाशक फवारणी करण्यास सांगितली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनाही योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. १२०वर पोहोचला संक्रमितांचा आकडाराजधानीत कोरोना पीडितांचा आकडा १२०च्या वर गेला आहे. दिल्लीत मंगळवारी २३ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२०वर गेली आहे. देशभरात १५९० जण कोरोनानं संक्रमित आहेत. तर मृतांची संख्या ४७च्या घरात आहे. मंगळवारी दिल्लीतल्या मोहल्ला क्लिनिकमधल्या आणखी एका डॉक्टरला व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे उत्तर पूर्व दिल्लीतल्या लोकांना सेल्फ क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तसेच दिल्लीत संभाव्य कोरोनाग्रस्तांची संख्या ८०० ते १००० पर्यंत वाढू शकते, असंही सांगितलं जात आहे.
CoronaVirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार १ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 4:43 PM