काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने मरकजला गेल्याचे लपवले, कोरोना पॉझिटिव्ह आढळताच दाखल झाला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 05:22 PM2020-04-10T17:22:23+5:302020-04-10T17:28:47+5:30
हा नगरसेवक, त्याची पत्नी आणि मुलीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
नवी दिल्ली - दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातीच्या मरकजच्या कार्यक्रमाला अजून आल्याची बाब लपवणे काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला महागात पडले आहे. हा नगरसेवक, त्याची पत्नी आणि मुलीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दिल्लीतील नझफगड दिनपूर गावातील काँग्रेसच्या एक माजी नगरसेवकाला आरोग्य अधिकाऱ्यांनी होम क्वारेंटिन राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र तपास अधिकारी त्याच्या घरी आले असता तो घरी नसल्याचे समोर आले. त्यानंतर अधिक माहिती घेतली असता त्याने केलेला प्रवास आणि तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात गेल्याची माहिती लपवल्याचे उघड झाले. तसेच त्याची आणि त्याच्या वैद्यकीय तपासणी केली असता तो, त्याची पत्नी आणि मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, होम क्वारेंटिनचा नियम मोडल्याप्रकरणी या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
याबाबत एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,' हा माजी नगरसेवक आणि त्याच्या कुटुंबियांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्याकडे आधी चौकशी केली असता त्याने मरकजच्या कार्यक्रमला गेल्याची बाब लपवली होती. नंतर त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळली तसेच तो कोरोना पॉझिटिव्ह सापडला.'
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर माजी नगरसेवकाचे वास्तव्य असलेले दिनपूर गाव बंद करण्यात आले आहे. तसेच घरातून बाहेर न पडण्याची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावला आहे. तसेच कोरोनाबाधितांची संख्या 720 पर्यंत पोहोचली आहे.