coronavirus: 'त्या' पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल, कोरोनाग्रस्त असतानाही पत्रकार परिषदेत होती हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 11:38 AM2020-03-28T11:38:29+5:302020-03-28T11:48:51+5:30
मध्य प्रदेशमध्ये २० मार्च रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणाऱ्या या पत्रकारामुळे इतर पत्रकारांसह राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशामधील भोपाळ शहरात राहणाऱ्या एका पत्रकाराच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्या पत्रकारालादेखील आता कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात विशेष म्हणजे कोरोनाबाधित पत्रकार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित होता. त्यामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित राहणाऱ्या या पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लंडनमधून मायदेशी परतलेल्या मुलीला क्वारंटाईन करण्यात आले असतानाही, या पत्रकाराने पत्रकार परिषदेत उपस्थिती लावल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.
मध्य प्रदेशमध्ये २० मार्च रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणाऱ्या या पत्रकारामुळे इतर पत्रकारांसह राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. देशभरात कोरोनाचे सावट असताना देखील मध्य प्रदेशामधील कमलनाथ सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत होते. या दरम्यान मध्य प्रदेशात विविध हालचालींना वेग आला होता. मात्र मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता टिकवण्यात अपयशी ठरली आणि भाजपाने बाजी मारली होती. याच सत्ता स्थापनेच्या वेळी कमलनाथ अनेकवेळा पत्रकारांशी संवाद साधत होते. कमलनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी एक भोपाळमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत केवळ भोपाळचेच नाही, तर दिल्लीतील काही पत्रकारही उपस्थित होते. त्यामुळे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह काही माजी मंत्री, राजकीय नेते आणि पत्रकारांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्री या पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीसी कलम १८८, २६९, २७० अंतर्गत शामला पोलीस ठाण्यात या पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संसर्ग असताना निष्काळजीपणा, आघात रोगाचा संसर्ग परविण्यास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे भोपाळ पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर वाढता धोका लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ८७९ वर गेली आहे. तर आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान,काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानं कमलनाथ यांचं सरकार कोसळलं. बहुमत नसल्यानं कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या राजकीय नाट्यानंतर आज भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.