नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बधित रुग्णांचा आकडा 170 च्या वर गेला आहे. अशा स्थितीत देशात होणाऱ्या विविध परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आहेत. तसेच शाळा, महाविद्यालय, मॉल, रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आहेत. अशा स्थितीत लॉक डाउन करण्यासंदर्भात काँग्रेसनेतेपी. चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली आहे.
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी ट्विट करून जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेल्या निर्देशांचा उल्लेख केला आहे. 'डब्ल्यूएचओ'च्या प्रमुखांनी स्पष्ट केल्यानंतरह राज्यातील विविध भागांसह अनेक शहरांत तीन ते चार आठवड्यांसाठी तत्काळ लॉक डाउन करण्याचे आदेश देण्यासाठी संकोच का बाळगण्यात येत आहे. केंद्र सरकारने आदेश देण्याआधी कोरोना रुग्ण वाढत असलेल्या राज्यांनी त्यांच्या भागातील शहरांमध्ये संपूर्ण लॉक डाउन करायला हवे, असंही चिदंबरम यांनी म्हटले आहे.
आणखी एका ट्विटमध्ये चिदंबरम म्हणाले की, आसीएमआरच्या सॅम्पल परिक्षणानंतर हे स्पष्ट झालं की, आतापर्यंत कोरोनाचा प्रसार तिसऱ्या स्टेजला पोहोचला नाही. त्यामुळे तातडीने लॉक डाउनची घोषणा करून हा आजार दुसऱ्या स्टेजला असतानाच रोखण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम म्हणाले की, देशाला सुरक्षीत ठेवायचे असेल तर काही शहरांमध्ये पूर्णपणे लॉक डाउन करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखणे शक्य होईल. तसेच सरकारने आर्थिक नुकसान सहन करून गरिबांची मदत करण्याची आवश्यकता चिदंबरम यांनी व्यक्त केली.