नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत असताना ओमायक्रॉनचा नवा सब व्हेरिअंट XBB.1.5 ने भारतात एन्ट्री केली आहे. या व्हेरिअंटने अमेरिकेत कोरोनाची लाट आणण्यास सुरुवात केली आहे. असे असताना चीनच्या व्हेरिअंटनंतर भारतात अमेरिकेतील दुसरा सुपर व्हेरिअंट सापडल्याने खळबळ उडाली आहे.
या व्हेरिअंटचाही पहिला रुग्ण गुजरातमध्ये मिळाला आहे. भारतीय SARS Cove-2 Genomics Consortium (INSACOG) च्या आकडेवारीनुसार, Omicron चे XBB.1.5 चा रुग्ण सापडला आहे. चीनचा bf.7 व्हेरिअंट पहिल्यांदा सापडला होता. या व्हेरिअंटने चीनमध्ये हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. यातच हा दुसरा व्हेरिअंट आल्याने जगाला कोरोनाने दोन्ही बाजुंनी वेढण्यास सुरुवात केली आहे.
XBB.1.5 चे रुग्ण अमेरिकेत सर्वाधिक आढळत आहेत. न्यूयॉर्कमधील रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या बहुतेक कोरोना रुग्णांना या व्हेरिअंटची लागण झालेली आहे. XBB व्हेरिअंट BA.2.10.1 आणि BA.2.75 पासून बनलेला आहे. भारताशिवाय जगातील इतर ३४ देशांमध्येही त्याचा प्रसार झाला आहे.
हा व्हेरिअंट ओमायक्रॉन श्रेणीतील सर्व प्रकारांपैकी सर्वात धोकादायक आहे. गुजरात आणि ओडिशामध्ये BF.7 चे रुग्ण सापडले आहेत. गुजरातमध्ये bf.7 ग्रस्त कोरोना रुग्णांच्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगनंतर, Omicron च्या XBB.1.5 प्रकाराचे पहिले प्रकरण समोर आले आहे.
महाराष्ट्राचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, आम्ही विषाणूच्या प्रसारावर लक्ष ठेवून आहोत. राज्य 100% जीनोमिक सिक्वेन्सिंग करत आहे. तर परदेशातून भारतात येणाऱ्या लोकांचे थर्मल स्क्रीनिंग आणि नमुने घेणे देखील सुरू झाले आहे. जे नमुने पॉझिटीव्ह येत आहेत ते जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात येत आहेत.