नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १९०० च्या वर पोहचली आहे. तर ५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे जनरल बिपीन रावत यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी भारतीय सैन्याच्या तयारीचा आढावा सांगितला.
सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी सांगितले की, कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी ९ हजारपेक्षा जास्त हॉस्पिटल बेडची व्यवस्था केली आहे. ८ हजार ५०० हून अधिक डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. गरज भासल्यास सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही सुविधा उपलब्ध करु शकतो. त्याचसोबत नेपाळला लवकरच कोरोनाशी लढण्यासाठी मदत पाठवली जाईल असंही ते म्हणाले.
तसेच देशभरात लागणारं २५ टन मेडिकल साहित्य गेल्या ५ दिवसांत विविध ठिकाणी पोहचवलं आहे. आगामी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी भारतीय वायू सेना आवश्यक ऑपरेशनल काम करेल असं भारतीय वायूसेनेचे चीफ एअर मार्शल यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी सैन्याच्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या ३० अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केलं गेलं आहे.
यापूर्वी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन नमस्ते'ची सुरुवात केली आहे. लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी स्वतः याची घोषणा केली होती. देशात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी लष्कराने एकूण आठ क्वारंटाइन सेंटर्स सुरू केली आहेत. ऑपरेशन नमस्तेची घोषणा करताना नरवणे म्हणाले होते की, या महामारी विरोधातील लढाईत सरकारला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. भूतकाळातही, अशा अनेक मोहिमा आपल्या लष्कराने यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ऑपरेशन नमस्तेही यशस्वीपणे पार पाडले जाईल.
...म्हणून जवानांनी दहा महिने सुट्टीच घेतली नव्हती
नरवणे म्हणाले होते, की अशा परिस्थितीत जवानांची सुट्टी रद्द केल्यास त्यांना वाईट वाटू शकते. याचा त्यांच्यावर परिणामही होऊ शकतो. मात्र, २००१-०२ साली ऑपरेशन पराक्रमदरम्यान लष्कराच्या जवानांनी जवळपास आठ ते दहा महिने सुट्टी घेतली नव्हती, याची आठवणी त्यांनी यावेळी करून दिली. देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नागरिकांनी गरज नसल्यास घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असंही मोदींनी सांगितलं होतं.