नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्र सरकारसह अनेक तज्ज्ञांनी वर्तविली आहे. दुसऱ्या लाटेपासून धडा घेत देशातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने कोविड आरोग्य पूर्वतयारी पॅकेजचा दुसरा हप्ता राज्यांना दिला आहे. याअंतर्गत ४ हजार १७३ कोटींचा दुसरा हप्ता देण्यात आला असून, आतापर्यंत एकूण ७ हजार कोटींचा निधी राज्यांना देण्यात आला आहे.संभाव्य तिसरी लाट हताळण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी औषधी, तसेच आवश्यक उपकरणांचे हब विकसित करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी २३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी १ हजार ८२७ कोटींचा पहिला हप्ता २२ जुलै रोजी देण्यात आला होता, तर ४ हजार १७३ कोटींचा दुसरा हप्ता नुकताच राज्यांना देण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका राहणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यानुसार लहान मुलांवरील उपचारांसाठी पूर्वतयारी करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत लहान मुलांसाठी जिल्हापातळीवर ८२७ युनिट उभारण्यात येणार आहेत.
पुरुषांच्या तुलनेत लसीकरणात महिला मागे- देशात लसीकरण मोहीम सुरू असून, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण १२ टक्के कमी झाले आहे. याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने चिंता व्यक्त करत, सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २८.०३ कोटी पुरुषांना आणि २४.९१ कोटी महिलांना लस देण्यात आली आहे. - महिला व बालविकास मंत्रालयाने म्हटले आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिलांना देण्यात आलेल्या लसींचे प्रमाण कमी असल्याने महिला आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.n महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी म्हटले आहे की, लसीकरण केंद्रावर येणाऱ्या महिलांची संख्या वाढविण्याची गरज आहे.