CoronaVirus : केंद्राच्या घोषणेचे राहुल गांधींकडून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 01:38 AM2020-03-27T01:38:28+5:302020-03-27T05:45:03+5:30
CoronaVirus : घोषणेनंतर लगेच राहुल गांधी यांनी सरकारने उचललेल्या या पावलाचे स्वागत केले आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आर्थिक साह्य देण्याच्या केलेल्या घोषणेमुळे आक्रमक विरोधी पक्ष शांत होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसह सगळे विरोधी पक्ष याप्रकारच्या दिलासा पॅकेजची मागणी करीत होते.
गुरुवारी सकाळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिूहन शेतकरी, रोजंदारीवरील व इतरांसाठी पॅकेजची मागणी केली होती. राहुल गांधी व प्रियांका गांधी हे तर अनेक दिवसांपासून टिष्ट्वटरद्वारे ही मागणी करीत होते. याशिवाय सीताराम येचुरी, मायावती, अखिलेश यादव यांनीही अशीच मागणी केली होती. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी १.७ लाख कोटी रूपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर लगेच राहुल गांधी यांनी सरकारने उचललेल्या या पावलाचे स्वागत केले आहे. ते टिष्ट्वटरवर म्हणाले की,‘‘योग्य दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे.’’ राहुल गांधी यांनी लॉकडाऊनमुळे रोजंदारीवरील मजूर, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथांचा उल्लेख केला होता.
पॅकेजच्या घोषणेआधी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून आर्थिक साह्याशिवाय ‘कोविड-१९’ साठी ठराविक रुग्णालयांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचा सल्ला सरकारला दिला. म्हणजे घबराट निर्माण झालेल्या लोकांना इकडे तिकडे भटकायची वेळ येणार नाही.