कोलकाता - एकीकडे देशातील कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असताना आता कोरोनावरून राजकारणही रंगू लागले आहे. कोरोनाचा अधिक धोका असलेल्या राज्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पथके पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पश्चिम बंगाल सरकारने केंद्र सरकारने केंद्राने पाठवलेल्या पथकाला कोरोनाबाधित क्षेत्राचा दौरा करण्यापासून रोखले आहे.
पश्चिम बंगालमध्ये पाहणी करण्यासाठी गेलेल्या पथकाला हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती या पथकातील एक सदस्याने दिली. या पथकाचे नेतृत्व करत असलेल्या अपूर्व चंद्रा यांनी सांगितले की, 'आम्हाला आज काही भागांचा दौरा करायचा आहे, असे आम्ही सांगितले होते. मात्र काही अडचणी आहेत. त्यामुळे आम्हाला बाहेर जाता येणार नाही असे प्रशासनाने कळवले.'
इतर राज्यात गेलेल्या केंद्राच्या पथकांना त्या राज्यांकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्या राज्यांना जी नोटीस देण्यात आली, तीच नोटीस पश्चिम बंगालला देण्यात अली होती. दरम्यान, त्या पथकांना मात्र कुठलाही त्रास सहन करावा लागला नाही,' असा दावाही त्यांनी केला.
केंद्र सरकारने चार राज्यात एकूण सहा अंतर मंत्रालयीन केंद्रीय पथके पाठवली आहेत. ही पथके महाराष्ट्रातील पुणे, राजस्थानमधील जयपूर, पश्चिम बंगालमधील कोलकाता, हावडा, मिडणापूर पूर्व, 24 परगणा उत्तर, दार्जिलिंग, कलिमपोंग, जलपैगुडी आणि मध्य प्रदेशमधील इंदूर येथे ही पथके पाठवण्यात आली आहेत. या शहरांमध्ये परिस्थिती गंभीर असून, तिथे लॉकडाऊनचे योग्य पालन होत नसल्याचे केंद्राचे निरीक्षण आहे. तसेच राज्य सरकारकडून कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी करून सांगितली जात असल्याचाही दावा करण्यात आहे. विशेषकरून पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा कमी करून सांगण्यात येत असल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या अंतर्गत अहवालात नमूद करण्यात आली आहे.