रायपूर - देशातील कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने वाढत आहे. विविध भागात नव्याने रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले असून, देशात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांचा आकडा 5 हजार 734 पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी कोरोना विषाणूच्या होत असलेल्या फैलावावरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप भुपेश बघेल यांनी केला आहे.
आम्ही राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेऊन काम केले त्यामुळे आमच्या राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात आम्ही यशस्वी ठरलो, असा दावाही बघेल यांनी यावेळी केला. भुपेश बघेल म्हणाले की, 'कोरोनाचा भारतात घुसण्यापासून रोखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. जर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या सर्व प्रवाशांना कवारेन्टीन केले असते तर कोरोनाचा रोखता आले असते. दुसरीकडे मी राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार काम केले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात आम्हाला यश आले.'
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी मोफत व्हायला पाहिजे तसेच याचा खर्च केंद्र सरकारने उचलला पाहिजे. तसेच केंद्र सरकारने जनधन खात्यात 500 ऐवजी 750 रुपये जमा केले पाहिजेत तसेच सर्व तीन हप्ते एकाच वेळी पाठवले पाहिजेत, अशी मागणी बघेल यांनी केली.
दरम्यान, छत्तीसगड सरकारने राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार काम केले. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात आम्हाला यश आले. राज्यात 76 हजार लोकांना होम क्वारंटीन करण्यात आले आहे. राज्याची सीमा सील करण्यात आली आहे. तसेच गावपातळीवरही सिलिंग करण्यात आले आहे. गावात आलेल्या प्रवासी मजुरांना गावाच्या सीमेबाहेर ठेवले आहे.