नवी दिल्ली - देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे आरोग्याच्या प्रश्नासोबतच मोठ्या आर्थिक संकटाचाही गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि रोजगार गेल्याने शहरांमधून मजूर आणि कामगारांनी गावाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे. त्यामुळे अशा स्थलांतरीत मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता अशा स्थलांतरीत मजुरांसाठी केंद्र सरकारने एका मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव गरीब कल्याण रोजगार योजना असे असून, या योजनेची औपचारिक सुरुवात २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतील.
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. या योजनेंतर्गत गावात गेलेल्या स्थलांतरीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना देशातील सहा राज्यांमधील ११६ जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित होणार आहे. २० जून रोजी होणाऱ्या योजनेच्या औपचारिक उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या सहा राज्यांचे मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे उपस्थित राहतील.
या योजनेसाठी सरकारला एकूण ५० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच या योजनेंतर्गत कामगारांना २५ प्रकारचे काम दिले जाईल. या योजनेचा लाभ बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओदिशा या राज्यातील कामगारांना मिळणार आहे. सुमारे २५ हजार कामगारांना या योजनेचा लाभ होईल, असा दावा करण्यात येत आहे. यासाठी या मजुरांची स्कील मॅपिंग करण्यात आली आहे.