नवी दिल्ली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात करण्यात आलेले लॉकडाऊन १५ एप्रिलनंतर मागे घेण्याची मागणी राज्यांमागून राज्ये करत असले तरी केंद्र सरकार चिंतेत असून निर्बंध शिथील करण्याबाबत कमालीची काळजी घेत आहे. देशात ७१२ जिल्ह्यांपैकी कोविड-१९ चे जिल्हे २११ वरून २७४ झाले ते फक्त तीन दिवसांत. हा फैलाव देशात ४० टक्के भागात झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग दिवसेंदविस वाढताना दिसून येत आहे. अमेरिकेत तर कोरोनाने हाहाकार माजला आहे. मात्र, जगभरातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी अमेरिकेत आढळला आहे. न्यूयॉर्क येथील एका वाघिणीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर, भारत सरकारने परिपत्रका काढून देशातील सर्वच प्राणीसंग्रहालयांना काळजी घेण्याचे आवाहन केलंय.
भारत सरकारच्या पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे. त्यामध्ये, अमेरिकेत एका वाघिणीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्वच प्राणीसंग्रहालयांच्या प्रमुखांना पत्र लिहून योग्य ती काळजी घेण्याचे सूचविण्यात आले आहे. प्राणीसंग्रहालयातील प्राणी आणि त्यांचे देखभाल करणाऱ्यांची विशेष काळजी घेण्याचं बजावण्यात आलं आहे. सर्वच प्राण्यांची सीसीटीव्हीच्या निगराणीत काळजी घ्यावी, तसेच देखभाल करणाऱ्या स्टाफलाही महत्वाची साधनसामुग्री उपलब्ध करुन द्यावी, असे या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात वाघिण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेच्या विभागानुसार प्राण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याची ही पहिली घटना आहे. ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटीच्या मते, कोरोना प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यामुळे 4 वर्षाच्या या वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्याला आधीपासूनच कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि वाघ त्याच्या संपर्कात आल्यानंतर तो कोरोना पॉझिटीव्ह झाला. या वाघिणीचं नाव नाडिया असून गेल्या १६ मार्चपासून हे प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या वाघिणीच्या संसर्गातून पर्यटकांना लागण झाल्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, आता प्राण्यांनाही कोरोनाची लागण होऊ शकते हे सिद्ध झाले आहे.
आतापर्यंत ११ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १५ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकतही कोरोनामुळे ३ लाखांहून अधिक जणांचा कोरोनाची बाधा झाली आहे. तर, आतापर्यंत ७ हजार,९०० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.