नवी दिल्ली - देशात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकार लवकरच कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी नवीन धोरण आणू शकतं. ज्या रुग्णांना अत्यंत गरज असेल त्याच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत सरकार विचार करत आहे. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सर्व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन घेतलं जातं होतं.
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ९०० च्या वर पोहचली आहे. तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार आता गंभीर असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. कोरोनाची सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांना घरात क्वारंटाईन केलं जाणार आहे. फोनद्वारे डॉक्टर कोरोना रुग्णांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवर येणारा ताण आणि कोरोनाग्रस्तांशी संपर्क कमी करण्यासाठी सरकार या धोरणात बदल करणार आहे.
आजतागायत ताप, खोकला, श्वास घेण्यास अडचण अशी लक्षण असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलला दाखल करण्याबाबत कोणतेही नियम नव्हते. कोणत्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घ्यावं हा निर्णय डॉक्टरांनी करायचा आहे. संभाव्य कोरोनाग्रस्ताचा रिपोर्ट येईपर्यंत रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवणार आहेत. त्यांच्या लक्षणांवरुन उपचार केले जाणार आहेत.
आरोग्य मंत्रालयाकडून जारी केलेल्या सूचनेनुसार सौम्य ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणं असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. देशात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता आगामी काळात हॉस्पिटलमधील बेड जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचे आहे. गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुविधा हव्यात त्यासाठी हे धोरण आखण्याची तयारी केली आहे.
चार गटात कोरोनाग्रस्तांची विभागणी
सूत्रांच्या माहितीनुसार कोविड १९ रुग्णांची चार गटात विभागणी केली जाणार आहे. पहिल्या गटात आयसोलेशनमध्ये ठेवण्याची आवश्यकता कारण त्यांच्यामुळे कोरोना संक्रमित होऊ नये. दुसऱ्या गटात कोरोनाबाधितांवर जास्त लक्ष देण्याची गरज असणारे, ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासू शकते. तिसऱ्या गटात रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करुन त्यांच्या तब्येतील वारंवार लक्ष ठेवणं आणि चौथ्या गटात ज्या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज नाही अशांचा समावेश करण्यात आला आहे.
८०-८५ टक्के रुग्ण घरातही ठीक होऊ शकतात
८०-८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षण आढळून येतात. त्यांच्यावर उपचाराची गरज असते. अशा रुग्णांना घरातच ठेवण्याची योजना आहे. दिवसाला त्यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवलं जाणार आहे. जर गरज भासली तरच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.