नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत देशातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची गरज वाढली आहे. तसेच वाढत्या चाचण्यांची गजर भागवण्यासाठी टेस्टिंग किटची आवश्यकताही वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली आयआयटीने देशातील सर्वात स्वस्त टेस्टिंग किट विकसित करण्यात यश मिळवले आहे. हे टेस्टिंग किट आज मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले असून, ते लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.
मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या टेस्टिंग किटची किंमत केवळ ३९९ रुपये इतकी माफक आहे. मात्र बाजारातील विक्रीवेळी या टेस्टिंग किटची किंमत ६५० रुपये राहील. तसेच या टेस्टिंग किटच्या माध्यमातून अवघ्या ३ तासांत कोरोना चाचणीचा रिपोर्ट मिळवता येईल. असा दावा आयआयटी दिल्लीने केला आहे. यामध्ये जर या टेस्टिंग किटला यश आले तर देशा्च्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बाब ठरणार आहे.
आयआयटी दिल्लीने विकसित केलेल्या टेस्टिंग किटची किंमत पुढीलप्रकारे निर्घारित करण्यात आली आहे. टेस्टिंग किट ३९९ रुपये, आरएनए किट १५० रुपये आणि बाजारातील किंमत ६५० रुपये .
याशिवाय अजून एक किट तयार करण्यात येत आहे. या टेस्टिंग किटमधून चाचणी केल्यानंतर दुसऱ्या चाचणीची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे या टेस्टिंग किटची किंमत कमी असल्याचे सांगण्यात ेत आहे. सध्या अँटिजन टेस्टमध्ये अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अजून एकदा आरटीपीसीआर टेस्ट केली जाते.
आयआयटी दिल्लीच्या वतीने टेस्टिंग किट बनवण्याचे हे तंत्र न्यूटेक मेडिकल डिव्हाइसला दिले जाणार आहे. त्यानंतर दर महिन्याला २० लाख टेस्ट करणे शक्य होणार आहे. देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सर्व टेस्टिंग किट आणि टेस्टिंग टूल बाहेरून मागवण्यात येत होते. मात्र आता भारतातच विविध प्रकारे कोरोनाच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यामध्ये आरटीपीसीआर, अंटिजन, पूल टेस्टिंग या तंत्रांचा समावेश आहे. तसेच पीपीई किट, मास्क, टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर यांची निर्मिती आता भारतातच होत आहे.