चंदिगढ: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन कर्तव्य पार पाडत आहेत. नागरिकांनी कारण नसताना घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावं, यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत. मात्र असं असताना पोलिसांवरच हल्ले होत असल्याच्या घटना देशाच्या काही भागांमध्ये घडत आहेत. पंजाबच्या पटियालामध्ये पोलिसांवर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती मोठ्या कौशल्यानं हाताळत असल्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचं कौतुक होत आहे. मात्र त्यांच्याच पटियाला शहरात लॉकडाऊन उल्लंघनाच्या घटना दररोज घडत आहेत. पटियालाच्या भाजी मंडईत असाच एक धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला. भाजी मंडईत जाताना रोखल्यानं निहंग शीखांनी पोलिसांवर तलवारीनं हल्ला केला. त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा हात कापला गेला.निहंगांचा (परंपारिक हत्यारं ठेवणारे आणि लांब कुर्ता घालणारे शीख) एक गट आज सकाळी पांढऱ्या कारमधून भाजी मंडईत आला. मंडी बोर्डच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळ थांबवलं आणि कर्फ्यू पासबद्दल विचारणा केली. मात्र ते थेट बॅरिकेडिंग तोडून पुढे गेले. पोलिसांनी त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर निहंगांनी गाडीतून बाहेर पडून पोलिसांवर हल्ला केला. त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा कापला गेला. या अधिकाऱ्याचा हात अक्षरश: शरीरापासून वेगळा झाला. निहंगांच्या हल्ल्यात आणखी दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.