मुंबई – राज्यात एकीकडे सत्ताधारी कोरोनाशी लढाई देत असताना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मुद्दाही गाजत आहे. येत्या २८ मे पर्यंत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य होणं बंधनकारक आहे. पण कोरोनामुळे राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने हा राजकीय पेच निर्माण झाला आहे.
मात्र उद्धव ठाकरेंना आमदार बनवण्यासाठी एक पर्याय आहे तो म्हणजे विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त असलेल्या २ जागा सध्या रिक्त आहेत. रामराव वडकुते आणि राहुल नार्वेकर यांच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेतील त्यांच्या जागा रिक्त आहेत. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरेंची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड करावी अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे. याबाबत महाविकास आघाडीचे नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.
पण अद्याप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीची घोषणा न झाल्याने राजकीय संकटात अडकलेल्या उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन विनंती केली आहे. या राजकीय पेचाप्रसंगी नरेंद्र मोदींनी मदत करावी, जर ते झालं नाही तर मला राजीनामा द्यावा लागेल असं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले त्यानंतर मोदींनीही संबंधित प्रकरणात लक्ष घालून माहिती मागवतो असं आश्वासन उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती सूत्रांनी एएनआयला दिली आहे.
तसेच विधान परिषद नियुक्तीवरुन ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे ते राज्यातील प्रशासनाला आणि काम करणाऱ्या प्रत्येकाला नाउमेद करणारे आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याची आहे, मात्र दुर्दैवाने जी परिस्थिती महाराष्ट्रात दिसत आहे त्यावरून आपल्याला चिंता वाटत असल्याचेही ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितल्याचे समजते.
दरम्यान, याविषयी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात कोरोना त्याविरुद्ध लढा देण्यासाठी सातत्याने चर्चा होत आहे. चारवेळा दोघांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सही झाली. तसेच गृहमंत्री अमित शहा हे देखील ठाकरे यांच्याशी फोनवर बोलले आहेत. त्यामुळे त्याचा लगेच असा अर्थ काढणे योग्य होईल असे वाटत नाही. बोलणे झाले की नाही हे ते दोघेच सांगू शकतील असे परब यांनी स्पष्ट केले आहे.
अन्य बातम्या
मोदी यांच्याशी चर्चेनंतर उद्धव यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा?
नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले...
रेड, ऑरेंज झोनसाठी आता 'हिमाचल मॉडेल'; मोदींच्या सर्व राज्यांना सूचना
यात कसलं आलंय डोंबलाचं राजकारण!; साधुंच्या हत्येवरून शिवसेनेचं योगींना प्रत्युत्तर
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न