मुंबई: देशातील कोरोना बाधितांचा आकडा ५६ लाखांच्या पुढे गेला आहे. दररोज जवळपास ९० हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. देशातील ७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठी आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचादेखील समावेश होता. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधण्यात आलेल्या या संवादात मोदींनी नव्या रणनीतीवर भर देण्यास सांगितलं.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात राबवण्यात येत असलेल्या 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' योजनेची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. माझं कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल. मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितलं. राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते म्हणाले. कोविडनंतरदेखील रुग्णांना वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रं सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
CoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख
By कुणाल गवाणकर | Published: September 23, 2020 9:37 PM