नवी दिल्ली : कोरोनाविरोधात भारताने सुरू केलेल्या लढ्यात आता आणखी एका प्रभावी औषधाची भर पडली आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडी म्हणजे कॉकटेल ड्रग या औषधाचा वापर आता दिल्लीमध्ये सुरू झाला आहे. स्वित्झर्लंड येथील रोशे या कंपनीने सिप्लाच्या सहकार्याने हे औषध भारतात दाखल केले आहे. हे औषध कोणत्याही कोरोना रुग्णाला दिले तरी ते ७० टक्के परिणामकारक ठरते. हे औषध घेतल्यास कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचा प्रसंग टाळू शकतो. भारतामध्ये कॉकटेल ड्रग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सिप्ला कंपनीने स्वीकारली आहे. हे औषध सध्या देशात काही विशिष्ट शहरांमधील काही रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा वापर जसजसा वाढत जाईल तसतसे त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात येईल. सिप्लाव्यतिरिक्त झायडस कंपनीनेही या औषधाच्या मानवी चाचण्यांसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी म्हणजे कॉकटेल ड्रग हे एक प्रकारचे इम्युनिटी बूस्टर आहे. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यानंतर ४८ ते ७२ तासांमध्ये त्याला हे औषध दिले जाते. ते देण्यासाठी २० ते ३० मिनिटांचा अवधी लागतो. कॉकटेल ड्रग दिल्यानंतर संबंधित रुग्णाच्या प्रकृतीवर किमान अर्धा-पाऊण तास लक्ष ठेवले जाते.
...असे काम करते कॉकटेल ड्रगnकॉकटेल ड्रग हे काही औषधांचे मिश्रण आहे. ते घेतल्याने रुग्णाची कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते. या औषधात कासिरिविमाब व इम्डेव्हीमाब या औषधांचा समावेश आहे. nया दोन्ही औषधांचे प्रत्येकी ६०० मिलिग्रॅम मिश्रण तयार करून कॉकटेल ड्रग बनवितात. nकॉकटेल ड्रग कोरोना विषाणूला मानवी पेशींमध्ये शिरकाव करण्यापासून रोखते. त्यामुळे विषाणूला प्रथिने मिळत नाहीत व त्याचे उत्परिवर्तन होण्यास प्रतिबंध करता येतो.
कोरोनाचे नवे २.११ लाख रुग्ण; ३,८४७ मृत्यूभारतात २४ तासांत कोरोनाचे नवे २ लाख ११ हजार २९८ रुग्ण आढळले तर ३,८४७ जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी ७३ लाख ६९ हजार ९३ झाली असून देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के आहे. बुधवारी २१ लाख ५७ हजार ८५७ चाचण्या केल्या गेल्या. यामुळे देशात एकूण ३३ कोटी ६९ लाख ६९ हजार ३५३ चाचण्या झाल्या आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याचा दर हा ९.७९ टक्के असून गेल्या सलग तीन दिवसांत तो दहा टक्क्यांच्या खाली राहिला आहे. देशात सध्या २४ लाख १९ हजार ९०७ जणांवर उपचार सुरू आहेत.