नवी दिल्ली - भारतामध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचे मत तज्ज्ञांकडून मांडले जात आहे. तसेच त्यामध्ये ओमायक्रॉनसह डेल्टा व्हेरिएंटही वेगाने पसरत आहे. गेल्या काही दिवसांत देशामध्ये कोरोनाच्या रुग्णांची दैनंदिन वाढ ही दीड लाखांच्या वर गेली आहे. तसेच ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही काही हजारांमध्ये आहे. मात्र ओमायक्रॉन हा व्हेरिएंट गंभीररीत्या आजारी पाडत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र ओमायक्रॉनमुळे बाधित झालेल्या रुग्णांमध्ये बरे झाल्यानंतरही काही समस्या दिसून येत आहेत. त्यामध्ये लाँग कोविडची लक्षणे दिसत आहेत.
युनायटेड किंग्डमच्या रिपोर्टनुसार कोविड-१९ चे दुर्मीळ लक्षण ब्रेन फॉग ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्येसुद्धा पाहायला मिळत आहे. द डेली एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती ZOE COVID स्टडी अॅपमध्ये आपले अनुभव मांडत आहेत. अनेकजण ब्रेन फॉगबाबत माहिती देत आहेत. त्यांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे अॅप रुग्णांनी सांगितलेल्या लक्षणांचे विश्लेषण करते.
ब्रेन फॉग गेल्या काही काळापासून कोविड-१९चे कॅमन लक्षण आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्रेन फॉगबाबत पहिले वृत्त २०२० मध्ये समोर आले होते. तेव्हा कोरोनाची पहिली लाट सुरू होती. ब्रेन फॉगचा कोरोनाची सामान्य लक्षणे जसे की, ताप, थंडी वाजणे, श्वास घेण्यास त्रास, खोकला आणि अंगदुखी यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
अल्बामा विद्यापीठ, बर्मिंगहॅमच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. श्रुती अग्निहोत्री यांनी दिलेल्य माहितीनुसार ब्रेन फॉगमध्ये डोकेदुखी आणि स्मृती कमकुवत होण्यासारख्या समस्या येऊ शकतात.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे डॉक्टर मायकेल झेंदी यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रेन फॉग कुठलीही मेडिकल टर्म नाही आहे. मात्र ही लक्षणे पाहून त्याला हे नाव दिले गेले आहे. जे रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळापासून मेंदूसंबंधीच्या समस्या पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये स्मृती कमकुवत होणे, फोकस न करणे आणि मायग्रेनसारख्या समस्यांचा समावेश होता.
डॉ. झेन्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुक्त झालेल्या तब्बल २० टक्के रुग्णांमध्ये अशी समस्या पाहिली गेली आहे. मात्र हे आकडे किती योग्य होते. याबाबत सांगणे कठीण आहे. तसेच यावर अधिक संशोधनाची आवश्यकता.