नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वेगाने होत असलेल्या संक्रमणामुळे देशात आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सद्य परिस्थितीवर लक्ष ठेऊन पक्षाचे धोरण ठरवण्यासाठी काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सध्याची चिंताजनक परिस्थिती विचारात घेऊन एक सल्लागार गट स्थापन केला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे या सल्लागार गटाचे अध्यक्ष असतील.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील या सल्लागार गटात एकूण 11 सदस्य आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, रणदीप सिंह सुरजेवाला, के. सी. वेणूगोपाल, पी. चिदंबरम, मनीष तिवारी, जयराम रमेश, प्रवीण चक्रवर्ती, गौरव वल्लभ, सुप्रिया श्रीनाते आणि राहुल गुप्ता यांचा या सल्लागार गटात समावेश आहे, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.