coronavirus : जनतेला सप्तसूत्री देणाऱ्या मोदींवर काँग्रेसने डागले सात तिखट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 04:15 PM2020-04-14T16:15:03+5:302020-04-14T16:18:10+5:30
लॉकडाऊनला देशाचा पाठिंबा आहेच, मात्र सरकारने देशवासीयांना जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदाऱ्या योग्यरीतीने पार पाडाव्यात
नवी दिल्ली - 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतरही देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित करत लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी मोदींनी आपल्या संबोधनादरम्यान जनतेला सात सूत्रांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, या सप्तसूत्रीवरून काँग्रेसने मोदींवर जोरदार टीका केली आहे. लॉकडाऊनला देशाचा पाठिंबा आहेच, मात्र सरकारने देशवासीयांना जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदाऱ्या योग्यरीतीने पार पाडाव्यात, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाच्यावतीने केंद्र सरकारला सात प्रश्न विचारले आहेत. तसेच या प्रश्नांचे उत्तर देण्याचे आव्हान केंद्र सरकारला दिले आहे.
1- कोरोनाला रोखण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे टेस्टिंग. 1 फेब्रुवारीपासून 13 एप्रिलपर्यंत देशात केवळ 2 लाख 17 हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत. या चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्राकडे काय योजना आहे.
2 - आघाडीवर राहून कोरोनाविरोधात लढा देणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यासाठी आतापर्यंत एन-95 मास्क आणि पीपीई किट्सची मोठया प्रमाणात टंचाई आहे. याबाबत केंद्र सरकार गप्प का? ही साधने कधी उपलब्ध होतील.
3 - कोरोनामुळे स्थलांतर केलेले कोट्यवधी मजूर आज रोजगार आणि रोजीरोटीसाठी झगडत आहेत. याबाबत तुमच्याकडे काय योजना आहे.
4 - लाखो एकर गहू आणि इतर पिके कापणीला आली आहेत. मात्र त्यासाठी योग्य ती व्यवस्था झालेली नाही. तसेच हमीभावाने धान्य खरेदी करण्याबाबत सरकार गप्प का आहे. शेती आणि शेतकरी सरकारच्या प्राधान्यक्रमात बसत नाहीत का?
5 - कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वीच देश बेरोजगारीशी झुंजत होता. आता बेरोजगारीचा दर भयानक रूप घेत आहे. अशा परिस्थितीत तुमचे कोविड-19 इकॉनॉमिक रिकव्हरी टास्कफोर्स कुठे आहे?
6 - देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले दुकानदार, लघु-मध्यम उद्योग देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहेत. यांना पुन्हा रुळावर आणण्यासाठी आर्थिक मदत देण्याबाबत काय योजना आहे.
7 - जगभरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी अब्जावधी च्या मदतीची घोषणा होत आहे. मग या यादीत आपले सरकार शेवटच्या स्थानावर का? सरकारची नियत आणि नीती देशाला भारी पडत आहे.