लखनऊ – देशात आणि राज्यात कोरोनाव्हायरसचा धोका सतत वाढत आहे. हे पाहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशव्यापी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली तर बुधवारी गृह मंत्रालयाने २० एप्रिलपासून कमी जोखीम असलेल्या ठिकाणी लॉकडाऊन प्रक्रियेत शिथिलता सूट देण्याची तयारी केली. सवलतींशी संबंधित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचनांमध्ये कृषी, आरोग्य, बांधकाम कामे, वाहतुकीशी संबंधित काही कामांना सशर्त सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु या वेळी मालगाडी वगळता सार्वजनिक वाहतुकीसारख्या इतर कोणत्याही रेल्वे किंवा बसला सुरु करण्यास परवानगी दिली नाही. यासंदर्भात कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देशाच्या विविध राज्यात अडकलेल्या कामगारांच्या मुद्द्यावरुन लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कामगारांना मदत करावी असं सांगत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, प्रत्येक वेळी गरीब आणि मजुरांवर संकट का येते? त्यांची परिस्थिती लक्षात घेता निर्णय का घेतले जात नाहीत? त्यांना रामभरोसे का सोडलं जातं? लॉकडाऊन दरम्यान रेल्वे तिकिटांचे बुकिंग का चालू ठेवले? विशेष गाड्यांची व्यवस्था का करण्यात आली नाही? त्यांचे पैसे संपत आहेत, रेशन संपत आहे, त्यांना असुरक्षित वाटत आहे, त्यांना गावी घरी जायचे आहे. याची व्यवस्था करायला हवी होती. अद्यापही योग्य नियोजनाने मदत करण्याची व्यवस्था होऊ शकते. कामगार या देशाचा कणा आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देवासाठी त्यांना मदत करा अशी विनंती त्यांनी केली आहे.
देशात सतत वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २४ मार्च रोजी संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत २१ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. जी व्यक्ती जिथं असेल तिथेच राहावं, घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आणले. यामुळे विविध राज्यात अडकलेले हजारो मजूर १४ एप्रिलची आतुरतेने त्यांच्या घरी जाण्याची वाट पाहत होते. परंतु, कोरोना विषाणूचा धोका कमी होण्यापेक्षा तो वाढत गेला. पंतप्रधान मोदींनी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, सूरत आणि मुंबईतील वांद्रे यासारख्या रेल्वे स्थानकांवर शहरात अडकलेले हजारो कामगार त्यांच्या घरी जाण्यासाठी जमल्याचं चित्र पाहायला मिळालं.