नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आणि प्रवक्ते संजय झा यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. तसेच कोरोनाकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये संजय झा म्हणाले की,’’माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र माझ्यामध्ये कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे पुढचे १० ते १२ दिवस मी होम क्वारेंटाईन राहणार आहे. कृपया कोरोनाच्या संक्रमाणाच्या धोक्याकडे दुर्लक्ष करू नका. सर्वांनी आपली काळजी घ्या.’’
दरम्यान, गुरुवारी देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने चिंताजनक पातळी गाठली आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल ६ हजार ८८ कोरोनाग्रस्त सापडले असून, आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या कोरोनाबाधितांची ही देशातील सर्वाधिक संख्या आहे. तसेच या २४ तासांत १४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे या २४ तासांत देशभरात ३ हजार २३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात ६ हजार ८८ रुग्णांची वाढ झाली त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला आहे. दरम्यान, या काळात १४८ जणांचा मृत्यू झाल्याने देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार ५८३ वर पोहोचली आहे. तर याच काळात ३२३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा ४८ हजार ५३४ वर पोहोचला आहे. सद्यस्थितीत देशामध्ये ६६ हजार ३३० कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.