नवी दिल्ली : काँग्रेसकडून 12 मार्चला आतापर्यंतची सर्वात मोठी दांडी यात्रा गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ही दांडी यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रा सुरू केला होती, ती 6 एप्रिल 1930 रोजी संपली होती. महात्मा गांधींच्या या ऐतिहासिक दांडी यात्रेला यंदा 90 वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून दांडी यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या दांडी यात्रेत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी होणार होते.
दरम्यान, चीनमधून सुरुवात होऊन हळुहळू जगभरात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूमुळे मानवजातीसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जगभरात आतापर्यंत ३८०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चीनपाठोपाठ इराण आणि इटलीमध्ये कोरोनाचा कहर दिसून येत आहे. तसेच भारतातील कोरोना रुग्णांची संख्या देखील आता 43वर पोहचली आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.