नवी दिल्ली – मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असताना काँग्रेसनेभाजपा आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यावर कोरोनाचं संकट असताना एक महिन्यानंतरही मंत्रिमडळ स्थापन करण्यात आलं नाही. लोकांच्या आरोग्यापेक्षा सत्तेला प्राधान्य दिल्याचा आरोप काँग्रेसनेभाजपावर केला आहे.
याबाबत काँग्रेसने ट्विट करुन म्हटलं आहे की, भाजपानं सत्तेला प्राधान्य दिल्याने हजारो लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. मध्य प्रदेशात जवळपास एक महिन्यानंतरही मंत्रिमंडळ स्थापन केलं नाही. आरोग्य संकट असताना भाजपाने विलंब का केला? लोकांच्या आरोग्यापेक्षा भाजपाने सत्तेला प्राधान्य दिल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच मध्यप्रदेशातील इंदूर हे कोरोनाचं केंद्रबिंदू बनलं आहे. कोरोनाविरुद्ध लढाई सुरु असताना भाजपा मध्य प्रदेशतील सरकार पाडण्यात व्यस्त होते. सध्या मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्रिमंडळात एकमेव शिवराज चौहान मुख्यमंत्री म्हणून आहेत. अशा कठीण परिस्थितीत आरोग्य मंत्र्यांची गरज होती. जो आरोग्य खातं सांभाळून कोरोनाविरुद्ध सख्त निर्णय घेऊ शकतं. मध्य प्रदेशात १ हजार ३१० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे भयंकर आहेत असा आरोप काँग्रेसने भाजपावर केला आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी भाजपाकडे मास्टर प्लॅन आहे का? आतापर्यंत मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही, अनेक आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. तसेच ज्या आमदारांनी काँग्रेसला फसवलं त्यांना टार्गेट करत म्हटलं आहे की, आमच्याशी धोका विसरुन जाऊ पण मध्य प्रदेशातील जनता हे विसरणार नाही. कोरोनाला जबाबदार भाजपा सरकार अशाप्रकारे त्यांनी ट्विटरवर हॅशटॅग वापरला आहे.
मध्य प्रदेशात गेल्या महिन्यात काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानं कमलनाथ यांचं सरकार कोसळलं होतं. बहुमत नसल्यानं कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकूण २३० आमदार निवडून जातात. यातील २५ जागा सध्या रिक्त आहेत. सध्या विधानसभेत एकूण २०५ आमदार आहेत. यापैकी १०६ आमदार भाजपाचे आहेत. त्यामुळे भाजपाकडे बहुमत आहे. त्यामुळे भाजपा नेते शिवराज चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सभागृहात बहुमत सिद्ध केलं.