नवी दिल्ली – ओमायक्रॉनचा सौम्य परिणाम होतोय असा समज करुन निष्काळजीपणा करु नका. कारण हे तुमच्या आरोग्यास धोकादायक ठरु शकतं. ओमायक्रॉन हा कोरोनाचा व्हेरिएंट आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने ओमायक्रॉन व्हेरिएंट भलेही कमी घातक असेल परंतु व्हॅक्सिनपासून बनलेली इम्युनिटी पार करण्यात तो सक्षम आहे. कोरोनातून बरे झालेले रुग्णही पुन्हा संक्रमित करु शकतो.
पण ज्या लोकांना अद्याप कोरोना झाला नाही आणि त्यांनी कोरोना लस घेतली नाही अशा लोकांना ओमायक्रॉन व्हेरिएंटचा मोठा धोका आहे. जर या लोकांना आधीच कोणता आजार असेल तर हा धोका २ ते ३ पट जास्त वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या या व्हेरिएंटमुळे जगात पुन्हा एकदा कोरोनाची लाट पसरण्याचा धोका वाढला आहे. भारतातही दिवसाला हजारो कोविड रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे.
एम्स रुग्णालयातील डॉक्टर अरविंद कुमार म्हणाले की, ओमायक्रॉन व्हेरिएंटचं गांभीर्य कमी आहे असं समजण्याची चूक करु नका. आपल्या देशाची लोकसंख्या इतकी जास्त आहे जर या व्हेरिएंटचा प्रार्दुभाव वेळीच रोखला नाही तर अनेकजण संक्रमित होऊ शकतात. आपण केवळ टक्केवारीत हे पाहू शकत नाही. ओमायक्रॉन हा कोरोनाचा व्हेरिएंट आहे. तो कोरोनापेक्षा वेगळा आहे असं समजू नका. ज्या वेगाने हा व्हेरिएंट भारतात पसरत आहे ते पाहता काही दिवसांत तो पीकवर पोहचेल. कमी वेळेसाठी असेल पण जास्त धोका आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
तसेच ज्या लोकांमध्ये कोविड संक्रमित झाल्यानंतर बनलेली नॅच्युरल इम्युनिटी आणि लसीपासून तयार झालेली इम्युनिटी. या दोन्हीही नाहीत त्यांच्यासाठी भलेही व्हेरिएंट असो पण कोरोना अतिशय धोकादायक आहे. यात ज्या लोकांना आधीच आजार आहेत त्यात ह्द्रयासंबंधित आजार, डायबिटिस, कॅन्सर आहे त्यांच्यासाठी सौम्य व्हेरिएंटही धोकादायक आणि जीवघेणा ठरु शकतो असंही डॉ. अरविंद कुमार यांनी सांगितले आहे.
मॅक्स इंटरल मेडिसिन विभागाचे डॉ. रोमेल टिक्कू यांनी सांगितले की, लोकं ओमायक्रॉनला खूप हलक्यात घेत आहेत हे सत्य आहे. आजपण कोविडबद्दल लोकांमध्ये नियमांचे पालन होताना दिसत नाही. मास्क योग्यरित्या लावले जात नाहीत. भारतात टक्केवारी नाही तर संख्या पाहिली जाते. जर संपूर्ण देशात १ हजार रुग्णांपैकी २०० रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तर मोठी गोष्ट नाही परंतु १-१ कोटी लोकं संक्रमित झाले तर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचीही संख्या वाढेल मग जो व्हेरिएंट सौम्य आहे तोच धोकादायक बनू शकतो. अमेरिकेत जसजसे रुग्णसंख्या वाढतेय त्यामुळे समस्या उभ्या राहू लागल्यात. आरोग्य सुविधेवर ताण येऊ लागला आहे. जे पहिल्यांदाच संक्रमित होतील आणि त्यांना आधीच काही आजार असतील तर त्यांच्यासाठी या व्हेरिएंटचा धोका दुप्पटीने वाढू शकतो असं ते म्हणाले.