नवी दिल्लीः भारतात कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 341वर पोहोचला असून, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये कोरोनाबाधित प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोना संक्रमित मृतांचा आकडा 6वर गेला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेनं (ICMR) देशातील विविध भागातील रुग्णांची खातरजमा केलेली आहे. दरम्यान, या साथीच्या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून अनेक राज्यांनी लॉक डाऊन केलेलं आहे. रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत देशात जनता कर्फ्यू आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना घरातच बसून राहण्याचं आवाहन केलं आहे.अत्यावश्यक सेवा सोडून इतर लोकांनी घराबाहेर पडू नये, असंही मोदींनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाची सर्वाधिक 74 प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी तीन परदेशी आहेत. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सात विदेशी नागरिकांचा कोरोना संसर्ग झालेल्यांमध्ये समावेश आहे. दिल्लीत दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यापैकी एक परदेशी नागरिक आहे, तर उत्तर प्रदेशात 24 प्रकरणे नोंदली गेली आहेत.रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केलेली आहे. या काळात मुंबई व काही शहरांतील उपनगरी सेवा वगळता, एकही रेल्वेगाडी धावणार नाही. बहुतांश विमान उड्डाणे बंद असतील आणि परदेशांतून येणाऱ्या सर्व विमानांना भारतात उतरण्यास शनिवार मध्यरात्रीपासूनच बंदी घालण्यात आली होती. शिवाय प्रवासी असतील, तरच एसटीच्या बसेस सोडण्यात येतील. कोरोना विषाणुचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ नये आणि घरीच थांबावे, यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची कल्पना मांडली आहे. त्याला नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Coronavirus: भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 341वर, आतापर्यंत सहा जणांचा झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 2:12 PM