राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना स्फोट झाला आहे. संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्टनंतर तब्बल 119 हून अधिक लोक संक्रमित आढळून आले आहेत.
दिल्लीतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ होत असतानाच रुग्णालयांत दाखल होणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येतही सातत्याने वाढत होत आहे. यानंतर आता केजरीवाल सरकारने दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत सोमवारी पॉझिटिव्हिटी रेट 25 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, सध्या 1912 कोरोना रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. यांपैकी 443 रुग्ण आयसीयूत, 503 ऑक्सिजन सपोर्टवर तर 65 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
दिल्लीत सोमवारी कोरोनाचे 19 हजार 166 नवे रुग्ण आढळून आले, तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. याच बरोबर, दिल्लीत सक्रिय रुग्ण संख्या 65 हजारांच्या पुढे गेली आहे. दिल्लीत कोरोना टेस्ट केली असता, प्रत्येक 4 पैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, या महिन्यात आतापर्यंत 10 दिवसांत 70 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.