नवी दिल्ली - एकीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे सर्व निर्बंध हळूहळू हटवण्याची तयारी सुरू असताना देशातील कोरोनाच्या फैलावाचे प्रमाण दिवसागणिक चिंताजनक पातळीवर पोहोचत आहेत. गेल्या दोन दिवसांत देशातील कोरोनारुग्णांच्या वाढीचा आकडा काहीसा स्थिर झाल्यानंतर बुधवारी देशात कोरोनाच्या रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला. अवघ्या २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल ४५ हजार ७२० रुग्ण सापडले असून, त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ वर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी देशभरात ४५ हजार ७२०रुग्ण सापडले. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ झाली आहे. तर काल दिवसभरात देशात एकूण १ हजार १२९ कोरोनाबाधिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोनाबळींची संख्या २९ हजार ८६१ वर पोहोलची आहे. देशात सद्यस्थितीत ४ लाख २६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ७ लाख ८२ हजार ६०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
महाराष्ट्रातही बुधवारी कोरोना रुग्णांच्या दैनंदिन नोंदीत मोठी वाढ झाली. राज्यात बुधवारी १० हजार ५७६ रुग्णांची नोंद झाली, तर २८० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३७ हजार ६०७ वर पोहोचली असून आतापर्यंत १२ हजार ५६६ मृत्यू झाले आहेत.
दरम्यान, देशात कोरोनाच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी आक्रमकपणे शोधमोहीम राबवली जात आहे. देशभरात दररोज साडेतीन लाखांहून अधिक कोरोना चाचण्या होत असून, देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांसी संख्या दीड कोटींहून अधिक झाली आहे. भारतापेक्षा अधिक कोरोना चाचण्या केवळ अमेरिकेत होत आहेत.