गुजरातमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. आता अहमदाबादमधील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइनमध्ये (National Institue of design) तब्बल 24 कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 178 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यामुळे, अहमदाबाद महापालिकेने NID कॅम्पसला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. एवढेच नाही, तर NID मधील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून ते रुग्णालयात असल्याचेही समजते.
गुजरातमधील एखाद्या शैक्षणिक संस्थेत कोरोना स्फोट होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, गेल्या महिन्यातच गांधीनगरमधील गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत (GNLU) तब्बल 162 रुग्ण आढळून आले होते. मात्र, आता GNLU कोरोना मुक्त झाले आहे.
देशात वाढतायत कोरोना रुग्ण - गुजरातसह देशातील काही इतर राज्यांतही कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत. देशात 7 मे रोजी 24 तासांत सुमारे चार हजार कोरोनाबाधित समोर आले होते. तर काल म्हणजेच 8 मे रोजी गेल्या 24 तासांत 3451 कोरोना रुग्ण समोर आले होते.
गुजरातचा विचार करता, येथे सध्या 147 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर 1590 जण क्वारंटाइन आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत 10,941 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.