अहमदाबाद - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. आतापर्यत 29 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 2 लाख 3 हजार 269 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांतच कोरोनाच्या नव्या 1990 नव्या रुग्णांचे निदान झाल्याने देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजार 496 वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयान रविवारी कोरोनासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली. भारतात आत्तापर्यंत 872 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुजरातमधीलकाँग्रेसचे वरिष्ठ नेते बदरुद्दीन शेख यांचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबत शोक व्यक्त केलाय.
आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1990 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती 26 हजार 496 पर्यंत पोहोचली आहे. तर या 24 तासात देशभरात कोरोनामुळे 49 जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच काळात 741 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 5 हजार 804 कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत. देशातील कोरोनाबाधित मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 872 वर पोहोचली आहे.
गुजरातमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि अहमदाबाद महानगरपालिकेतील पार्षद बदरुद्दीन शेख यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. येथील एसव्हीपी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बदरुद्दीने हे कोरोना लॉकडाऊनच्या काळात सातत्याने लोकांमध्ये जाऊन काम करत होते. त्यातूनच, त्यांना कोरोनाची लागण झाली. गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. बदरुद्दीन यांच्या निधनामुळे गुजरातमधील काँग्रेसमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. तेथील वरिष्ठ काँग्रेस नेते शक्तीसिंह गोहिल यांनी शोक व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला. युवक काँग्रेसचे नेते असल्यापासून आम्ही त्यांना ओळखत होतो, आज माझ्याकडे शब्द नाहीत, अशा शब्दात गोहिल यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन बदरुद्दीन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, या दु:खी घटनेत मी त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या हितचिंतकांसमवेत आहे, असेही राहुल यांनी म्हटले आहे.