द्वारका - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील अनेक भागात आपले क्रूर रूप दाखवले आहे. (corona virus in India)देशातील अनेक भागांप्रमाणेच गुजरातमध्येही कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर गेली आहे. अनेक कुटुंबातील कर्ती मंडळी या कोरोनाची शिकार झाली आहे. दरम्यान गुजरातमधील द्वारका जिल्ह्यात कोरोनाबाधित वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबानेच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (corona virus in Gujarat)
द्वारका येथे राहणाऱ्या जयेशभाई जैन हे नाश्त्याचे दुकान चालवत होते. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांना धक्का बसला. शुक्रवारी जयेशभाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांची पत्नी साधनाबेन आणि दोन मुलगे कमलेश आणि दुर्गैश जैन यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. सकाळी दुधवाला घरी आल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि सामूहिक आत्महत्येचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, गुजरामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. तसेच कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मृतांचे प्रमाण एवढे कमी आहे की, अंत्यसंस्कारांसाठी स्मशानातील जागाही कमी पडत आहे. त्यातच आज द्वारकेमधून ही बातमी आल्याने लोकांमधील भीती अधिक प्रमाणात वाढली आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंसोबतच या महासाथीमुळे निर्माण झालेली भीतीही मृत्यूचे कारण ठरत आहे.