नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता फैलाव रोखावा की अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरावा, अशा द्विधा मनस्थिती सध्या देश सापडला आहे. एकीकडे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच ग्रीन आणि ऑरेंज झोनसह रेड झोनमधील काही उद्योग, व्यवसासांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळण्यास सुरुवात झाल्यापासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली असून, १ मे ते ३ मे या अवघ्या तीन दिवसांच्या काळात देशात कोरोनाचे तब्बल साडे सात हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४२ हजारांच्या वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांत पंजाब आणि दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढले आहे.
देशात आतापर्यंत कोरोनाचे ४२ हजार ५३३ रुग्ण सापडले आहेत. पैकी ११ हजार ७०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात सध्याच्या घडीला कोरोनाचे २९ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
दरम्यान, देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा रविवारी संपल्यानंतर आजपासून देशातील विविध भागात मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या रेड झोनमध्येही दारुची दुकाने उघडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
गेल्या तीन दिवसांतील देशामधील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास महाराष्ट्रातील आकडेवारीत किंचित घट झालेली दिसत आहे. मात्र दिल्ली आणि पंजाबमध्ये कोरोनाचे आकडे लक्षणीय प्रमाणात वाढले आहेत. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४२७ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजार ५४९ वर पोहोचला आहे. तर पंजामधील कोरोनाबाधितांच्या आकड्यातही दुपटीने वाढ झाली आहे. पंजाबमध्ये शुक्रवारी ५८५ कोरोनाबाधित होते, तो आकडा रविवारी १ हजार १०२ झाला आहे. दिल्लीलगतच्या हरिणायामध्ये आतापर्यंत कोरोना नियंत्रणात होता. मात्र आता येथेही कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या राज्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या गुजरातमध्ये काल ३७४ रुग्ण सापडले. त्यामुळे गुजरातमधील कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार ४२८ झाला आहे.