तिरुवनंतपुरम - देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच आता पुन्हा एकदा काही राज्यांमधून कोरोनाच्या रुग्णसंख्येने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. (Coronavirus in Kerala) देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली असताना केरळमध्ये मात्र कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कोरोनाच्या रुग्णांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन केरळ सरकारने या आठवड्यापासून विकेंड लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलमधील सहा सदस्यांना केरळमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. (Corona outbreak, severe weekend lockdown in Kerala)
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, केरळमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत हे पथक कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या व्यवस्थापनामध्ये राज्यात सुरू असलेल्या प्रयत्नांना मदत करेल. केरळमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र अन्य भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे.
केरळमध्ये बुधवारी कोरोनाच्या २२ हजार ०५६ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून ३३ लाख २७ हजार ३०१ झाली आहे. तर १३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने या विषाणूमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या १६ हजार ४५७ एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात १७ हजार ७६१ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ३१ लाख ६० हजार ८०४ एवढी झाली आहे.
दरम्यान, भारतामध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४३ हजार ५०९ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर याच काळात ३८ हजार ४६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रिकव्हरी रेटचा विचार केल्यास तो ९७.३८ टक्के आहे. भारतामध्ये अद्याप कोरोनाचे ४ लाख, ०३ हजार ८४० सक्रिय रुग्ण आहेत. देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हा ५ टक्क्यांखाली २.३८ टक्के आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट हा २.५२ टक्के नोंदवला गेला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशातील ४३ लाख, ९२ हजार ६९७ जणांना कोरोनाविरोधातील लस मिळाली आहे. आतापर्यंत देशातील ४५ कोटी ०७ लाख ०६ हजार २५७ जणांचे लसीकरण झाले आहे.