ग्रेटर नोएडा - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लोकांना शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याबरोबरच कोरोना विषाणू हा अनेकांसाठी मानसिक त्रासाचेही कारण ठरत आहे. (coronavirus in India) त्यातून काही जणांकडून टोकाचे पाऊल उचलण्यासारखी कृत्यं केली जाच आहेत. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये घडली आहे. येथे एका कोरोनाबाधित महिला डॉक्टरने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ( Corona positive female doctor commits suicide by jumping from 14th floor)
ही घटना ग्रेटर नोएडामधील सूरजपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. येथील एक महिला डॉक्टर आणि तिच्या पतीचा कोरोना रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. ते सेक्टर १३७ मधील पॅरामाऊंट सोसाटीमध्ये वास्तव्यास होते. येथील १४ व्या मजल्यावरून उडी मारून या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ९८ टक्के रुग्ण हे बरे होतात. त्यामुळे कोरोना झाल्यावर घाबरून जाऊ नका, तर खबरदारी घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, देशात कोरोना विषाणूच्या फैलाव वेगात सुरू असून, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ३ लाख ४६ हजार ७८६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर २ हजार ६२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख १९ हजार ८३८ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १ कोटी ६६ लाख १० हजार ४८१ एवढी झाली आहे.