चंदिगड - दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी कोरोनाबाबतच्या नियमांकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. (Coronavirus in India) असाच प्रकार पंजाबमधील संगरूर येथे घडला आहे. येथील गुरुद्वारामध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने शेकडो जणांना प्रसादाचे वाटप केले. यामध्ये दोन बड्या व्यक्तींचाही समावेश आहे. पंजाबचे शिक्षण मंत्री विजय सिंगला आणि संगरूरचे माजी आमदार प्रकाशचंद गर्ग हे यावेळी गुरुद्वारात उपस्थित होते. तसेच त्यांनीसुद्धा गुरुद्वारातील ग्रंथी असलेल्या या कोरोनाबाधित व्यक्तीकडून प्रसाद स्वीकारला. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित व्यक्तीकडून प्रसाद घेणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावात कोविड टेस्टिंग कॅम्पचे आयोजन करण्यास सांगण्यात आल्याची माहिती दिली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुद्वारातील ग्रंथींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांनी चाचणीसाठी ३१ मे रोजी दिलेले सॅम्पल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतरही त्यांनी गुरुद्वारात प्रसाद वाटला होता. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीने जेव्हा गुरुद्वारामध्ये प्रसाद वाटप केले तेव्हा तिथे खूप लोक उपस्थित होते. दिल्लीत आंदोलन करत असलेले शेतकरी करमजित सिंग यांच्या निधनानंतर ते इथे हजर राहिले होते. ग्रंथींनी १ जून रोजी गुरुद्वारामध्ये प्रसाद वाटला होता. दरम्यान, त्यांची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आली होती. या घटनेनंतर गावामध्ये ३० जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गुरुद्वारामध्ये त्या दिवशी किती लोक उपस्थित होते याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. पंजाबमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण हे ग्रामीण भागांत सापडत आहेत. तसेच येथील मृत्यूदर शहरी भागांमध्ये सुमारे तीन पट अधिक आहे.
Coronavirus: कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने मंत्र्यांसह शेकडो जणांना वाटला प्रसाद, आतापर्यंत ३० जणांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 9:26 AM