कानपूर – कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिगचं पालन करावं कारण कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना कोरोनाची लागण होते, त्यामुळे कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनेकदा माणसं एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, कोरोनामुळे अनेकदा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत.
अलीकडेच असेच एक प्रकरण समोर आलं आहे, यात एक व्यक्ती खोकत-खोकत जमिनीवर पडतो, असह्य वेदनांनी त्याचा जीव जातो, पण संभाव्य कोरोना रुग्ण समजून त्या व्यक्तीच्या मदतीला कोणीच धावून येत नाही. अखेरच्या क्षणाला त्याला पाणी पाजण्यासाठीही कोणी पुढे आला नाही, शेजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी मृतदेह पाहून पुन्हा परतले.
मृतकाच्या भावाने सीएमओ कार्यालयाला याची माहिती दिली. पण सीएमओनेही रुग्णवाहिका आणि मेडीकल टीम पाठवण्यास नकार दिला असा आरोप त्यांनी केला आहे. अखेर २० तास घराबाहेर मृतदेह तसाच पडून राहिला, त्यानंतर मंगळवारी सकाळी पोलिसांनी मृतदेह एका लोडरमध्ये ठेऊन नातेवाईकांना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले.
बिधानू पोलिस स्टेशनच्या पहाडपूर गावात राहणाऱ्या ओमी द्विवेदी (वय ५०) यांचे लग्नही झाले नव्हते. त्यामुळे तो घरात एकटाच राहत होता. ओमी द्विवेदी यांना गेल्या अनेक आठवड्यांपासून खोकला आणि ताप होता. शेजार्यांसह संपूर्ण परिसर त्यांना संभाव्य कोरोनाग्रस्त मानत होता, संसर्गाच्या जोखमीमुळे लोक त्यांना भेटायलाही जात नव्हते. सोमवारी दुपारी ओमी घराबाहेर बसले होते तेव्हा अचानक खोकला आला. खोकल्यामुळे ते जमिनीवर पडले आणि असह्य वेदनांनी तडफडून त्यांचा जीव गेला. संपूर्ण परिसर हे समोर बघत होते, पण कोणीही त्यांच्या मदतीसाठी गेले नाहीत.
सोमवारी दुपारी ओमी द्विवेदी यांचा खोकल्यामुळे जीव गेला. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या भागात संक्रमण पसरण्याची भीती लोकांच्या मनात होती. स्थानिकांनी पोलिसांना आणि १०८ नंबरच्या रुग्णवाहिकांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेले पोलिसही दूरवरुन मृतदेह पाहून परत आले. मयत ओमी द्विवेदी यांच्या भावाला जेव्हा ओमीच्या मृत्यूची बातमी मिळाली ते घटनास्थळी पोहोचले. संभाव्य कोरोना संक्रमित असल्याने त्यांच्या मृत्यूची माहिती त्याने सीएमओला दिली. रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक पाठविण्यास नकार देत सीएमओने फोन डिस्कनेक्ट केला. सोमवारी दुपारी ते मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत या व्यक्तीचा मृतदेह घराबाहेरच होता. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या मृताच्या भावाने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचे म्हटले आहे.