नवी दिल्ली : कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या विविध लसी जनतेला वेगवेगळ्या किमतीला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्यूट कोरोना प्रतिबंधक लसीच्या दहा कोटी डोसचे उत्पादन करणार असून, प्रत्येक डोस २४० रुपयांपेक्षा कमी किमतीला उपलब्ध करून देण्याची योजना आहे. मात्र, अन्य कंपन्या बनवत असलेल्या लसींच्या किमती भारत व विदेशात वेगवेगळ्या असतील. काही कंपन्यांना लस विक्रीतून मोठा नफा कमाविण्याची इच्छा नाही. काही देशांत सरकारच कंपन्यांना लस संशोधनासाठी निधी पुरवत आहे.कोरोनावरील प्रतिबंधक लस यंदाच्या वर्षी तयार होऊ शकली नाही, तर पुढच्या वर्षी या संशोधनाला नक्की यश येईल, असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटत आहे. जगामध्ये विविध कंपन्या, संस्था कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी प्रयोग करीत आहेत.मात्र, त्या लसीच्या प्रत्येक डोसची किंमत काही हजार रुपयांत असण्याची शक्यता आहे. सिरम उत्पादित करणार असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची किंमत जगातील या प्रकारच्या इतर लसींच्या किमतींपेक्षा सर्वात कमी असणार आहे.कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासाठी त्या कंपन्यांना अमेरिकी सरकारने निधीही पुरविला आहे. त्या बदल्यात लसीची किंमत कमी राखण्यासाठी अमेरिकी सरकारने विविध कंपन्यांशी याआधीच करार केले आहेत. काही देशांत आर्थिकदृष्ट्याा दुर्बल गटाला ही लस मोफत दिली जाईल.मॉडेर्ना कंपनीच्या लसीची अमेरिकेतील किंमत ३९ डॉलर असू शकते; पण हीच लस अन्य देशांमध्ये स्वस्त किमतीत मिळण्याची दाट शक्यता आहे.अॅस्ट्राझेनिसा, जॉन्सन अँड जॉन्सन, फायझर या कंपन्यांनी म्हटले आहे की, कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनातून प्रचंड नफा कमावण्याची आम्हाला इच्छा नाही. मात्र, मॉडेर्ना कंपनी लसीला जितका उत्पादन खर्च झाला त्यापेक्षा जास्त किंमत ठेवणार आहे.कोणत्या लसीची किती असेल किंमत?अमेरिकेतील मॉडेर्ना ही कंपनी कोरोना प्रतिबंधक लस विकसित करीत असून, तिच्या प्रत्येक डोसची किंमत ३,७०० ते ४,००० रुपये यांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.फायझर कंपनीच्या लसीच्या प्रत्येक डोसची किंमत ३,००० रुपये, तर ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवत असलेल्या लसीच्या प्रत्येक डोसची किंमत १,००० रुपयांपेक्षा कमी असेल.निरनिराळ्या देशांत कोरोना प्रतिबंधक लसीच्या किमती वेगवेगळ्याही असू शकतात.
CoronaVirus News: कोरोनाच्या लसी जनतेला वेगवेगळ्या किमतीला उपलब्ध होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 2:59 AM