करनाल – सध्या देशात कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाखांच्या वर पोहचला आहे. तर ३ हजारांपर्यंत लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर्स रुग्णांची सेवा करत आहेत. पण हरियाणामध्ये एका डॉक्टरसोबत जो प्रकार घडला आहे तो सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे.
सीएम सिटी करनालमध्ये लॉकडाऊनदरम्यान एक अजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एक डॉक्टर आपल्या नवविवाहित पत्नीसोबत रस्त्याच्या कडेला चहा विकण्याचं काम करत आहे. डॉक्टरचा आरोप आहे की, त्याने हॉस्पिटलला पगार देण्यास सांगितले तेव्हा मला कामावरुन काढून टाकण्यात आलं. पीडित डॉक्टर गौरव वर्मा एका खासगी रुग्णालयात काम करत होते. त्यांचा दोन महिन्याचा पगार झाला नाही. जेव्हा डॉक्टरने पगाराची मागणी केली त्यावेळी त्यांची बदली करण्यात आली. बदलीचा विरोध केल्यानंतर रुग्णालयातून त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याचा आरोप डॉक्टरने केला आहे.
सध्या हा डॉक्टर गणवेशात करनाल सेक्टर १३ च्या रस्त्याच्या कडेला चहा बनवून लोकांना विकण्याचं काम करतो. रुग्णालयाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी डॉक्टरने सरकारकडे केली आहे. पीडित डॉक्टरचं म्हणणे आहे की, याबाबत रुग्णालयाच्या प्रशासनाशी चर्चा केली. मात्र त्यांनी माझं ऐकलं नाही. रुग्णालयाने त्यांची बदली गाजियाबाद येथे केली. विवाद वाढल्यानंतर गौरव यांना नोकरीवरुन काढण्यात आलं. याबाबत डॉक्टर गौरव वर्मा यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची विनंती केली आहे. पण न्याय मिळत नसल्याने अखेर त्यांनी हॉस्पिटलच्या समोरचं चहा विकण्याचं काम सुरु केलं.सिव्हिल सर्जन डॉ. अश्विनी अहूजा यांनी सांगितले की, या प्रकरणी आमच्याकडे तक्रार आली आहे. तात्काळ यावर टिप्पणी करणे योग्य नाही. हा चौकशीचा विषय आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या विषयात स्पष्टीकरण देऊ. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
मात्र हॉस्पिटल प्रशासनाने डॉक्टर गौरव वर्मा यांच्या आरोपाचं खंडन करत म्हटलं आहे की, लॉकडाऊनमुळे पगार देण्यात अडचण येत आहे. पण गौरव वर्मा यांनी जे वक्तव्य केलं आहे ते चुकीचं आहे. त्यांना अनेकदा बेकायदेशीर काम करताना पकडलं. यावरुन त्यांनी तीन-चार वेळा नोटीस बजावली. प्रशासनाच्या वरिष्ठांनी गौरव यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नकार दिला. त्यांना काही अडचण असेल तर हे प्रकरण संवादातून सुटू शकतं असं ते म्हणाले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आमदार रोहित पवार अन् निलेश राणे यांच्यातील ‘ट्विटर युद्ध’ पेटलं; मला, बोलत राहिलास तर...
राज्यात आता दोनच झोन, नवी नियमावली जाहीर; पाहा, तुमचा जिल्हा कोणत्या झाेनमध्ये येतो?
पीओकेमधून ३०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत; सुरक्षा जवान अलर्ट
...मग ‘या’ स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे? शिवसेनेचा महाविकास आघाडी सरकारला सवाल