नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग चिंताजनक पातळीपर्यंत वाढला आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ८ हजार ८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर या काळात ४५९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. वेगाने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ४७ हजार ९९५ एवढी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या ८ हजार ०८४ नव्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ३२ लाख, ३० हजार १०१ एवढी झाली आहे. तर १० जणांच्या मृत्युमुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून ५ लाख २४ हजार ७७१ एवढी झाली आहे.
तत्पूर्वी रविवारी देशात कोरोनाचे ८ हजार ५८२ नवे रुग्ण समोर आले होते. तसेच ४ जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी एकूण ८ हजार ३२९ रुग्ण समोर आले होते. सरकार कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देत आहे. देशातील कोरोनाच्या एकूण लसीकरणाचा आकडा १ अब्ज ९५ लाखांच्या वर पोहोचला आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाचे ७३५ नवे रुग्ण सापडले. यादरम्यान, ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर शुक्रवारी ६५५ नवे रुग्ण सापडले होते. तर २ जणांचा मृत्यू झाला होता. दिल्लीतील सक्रिय रुग्णांची संख्या २००८ एवढी झाली आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट हा ४.९४ टक्के आहे.
मुंबईचा विचार केल्यास येथे रविवारी १ हजार ८०३ नवे कोरोनाबाधित सापडले. तर एका दिवसामध्ये ९५९ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली. मुंबईमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ८८९ वर पोहोचली आहे.