नवी दिल्ली - दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर देशात अनलॉकला सुरुवात झाल्यानंतर कोरोनाच्या फैलावाने वेग घेतला आहे. दररोज देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चिंताजनक पातळीवर वाढ होत असून, गेल्या काही दिवसांत देशभरात मिळून दररोज ३० हजारांहून रुग्ण सापडू लागले आहेत. सद्यस्थितीत देशातील कोरोनाबाधितांची संख्या साडे दहा लाखांच्या वर गेली असून, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) भारतातील कोरोनाच्या संसर्गाबाबत चिंताजनक माहिती दिली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती बिघडली असून, देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला आहे, अशी माहिती आयएमएने दिली आहे.
आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे चेअरपर्सन डॉ. व्ही. के. मोंगा यांनी सांगितले की, देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ही बाब खूप चिंताजनक आहे. देशात दररोज ३० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. ही परिस्थिती खूप वाईट आहे. आता कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. हे खूप वाईट संकेत असून, देशात समूह संसर्ग झाल्याचे दिसत आहे.
एकीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालय देशात समूह संसर्ग सुरू झाला नसल्याचा दावा सातत्याने करत असतानाच डॉ. मोंगा यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या समूह संसर्ग झाल्या नसल्याच्या दाव्याला अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी आव्हान दिले आहे. दरम्यान, प्रचंड वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे भारत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
दरम्यान, डॉ. मोंगा म्हणाले की, कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. दिल्लीमध्ये आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्य प्रदेशमधील दुर्गम भागात काय होणार. कोरोना हा असा आजार आहे, जो खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारांनी संपूर्ण सावधगिरी बाळगली पाहिजे, तसेच केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे.
अमेरिका आणि ब्राझीलनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे भारतात आहेत. शनिवारच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाचे दहा लाख ३८ हजार ७१६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामधील २६ हजार २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ लाख ५३ हजार ७५१ जणांनी कोरोनाला मात दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी