भोपाळ- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. देशात लॉकडाऊन करण्यात आलं असून, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणाही कमालीची कामाला लागली आहे. अनेकदा रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना कोरोना झाल्याचंही निष्पन्न झालं आहे, तर काही डॉक्टरांना कर्तव्यापायी घराकडेही फिरकता येत नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांना बरं करण्यासाठी डॉक्टर कसोशीनं प्रयत्न करत आहेत. अशातच २४-२४ तासही डॉक्टर सेवा बजावत आहेत. डॉक्टरांना वाढत्या रुग्णांमुळे घरी जाणंही शक्य होत नाही.
मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये अशाच एका डॉक्टरनं कर्तव्याचं मूर्तिमंत उदाहरण समोर ठेवून आदर्श निर्माण केला आहे. भोपाळचे सीएमएचओ डॉ. सुधीर डेहरिया दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. सीएमएचओ डॉ. सुधीर डेहरिया सोमवारी पाच दिवसांनंतर आपल्या घरी पोहोचले. परंतु कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सतर्कताही बाळगली. घरात प्रवेश न करताच ते घराबाहेरच बसून राहिले. घराच्या बाहेर बसूनच चहा प्यायले आणि तिथूनच घरच्यांची विचारपूस केली. त्यानंतर पुन्हा कर्तव्य बजावण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. घराच्या बाहेर बसून चहा पितानाचा या डॉक्टरचा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीसुद्धा ट्विटर हँडलवरून डॉ. डेहरिया यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.