नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत असताना आता महत्त्वाच्या सरकारी कार्यालयामध्येही कोरोनाचा शिरकाव होताना दिसत आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांच्यामध्ये काल कोविड-१९ ची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचा व्यापक प्रमाणात शोध घेण्यात आला असून सुमारे ३५ अधिकाऱ्यांना होम क्वारेंटाईन करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, संरक्षण सचिवांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही याबाबत संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र संरक्षण सचिव अजय कुमार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती लष्करातील दोन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्रालयात आलेले नाहीत.
संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव, लष्करप्रमुख आणि नौदलप्रमुखांची कार्यालये साऊथ ब्लॉकमधील पहिल्या मजल्यावर आहेत. दुसरीकडे राज्यसभा आणि लोकसभा सचिवालयातील तीन अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्या संपर्कातील अन्य कर्मचाऱ्यांना होम क्वारेंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कार्यालयांना सँनिटाईझ करण्यात आले आहे.